सातार्‍यात एसटीचे वेळापत्रक कोलमडले   

प्रवासी ताटकळले; पुणे, मुंबईला जाण्यासाठी रांगा 

सातारा, (प्रतिनिधी) : ’प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद वाक्य असलेल्या महामंडळाच्या सातारा विभागातील बसेसचे ऐन उन्हाळी हंगामात रविवारी वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे एसटीची वाट पाहत प्रवाशांना ताटकळत रस्त्यावर उभे रहावे लागले. रविवारी सातारा बसस्थानकात पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, प्रवाशांना एस.टी. बसेस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागले.
 
पुणे-बंगळूर महामार्गावरील मध्यवर्ती बसस्थानक म्हणून ओळखल्या जाणार्‍या सातारा बसस्थानकात सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी झाली होती. त्यामुळे सातारा बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीन गजबजून गेले होते. गावोगावी यात्रा-जत्रा, लग्नसराई, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लागलेली सुट्टी, त्यामुळे प्रवाशांचा लोंढा एसटीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे लांब पल्यासह ग्रामीण भागात धावणार्‍या सर्व एसटी बसेस पुर्ण भरुन धावतांना दिसत आहेत. 
 
तसेच आगाऊ तिकीट आरक्षण करण्यासाठी आरक्षण केंद्रावरही प्रवाशांची गर्दी दिसत आहे. बसेसचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडलेले दिसले, कारण प्रवासी एसटी बसेसविना रस्त्यावर उभा असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळाले. सातारा बसस्थानकातील पुणे, मुंबई व वाई फलाटावर प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. 
 

Related Articles